शुक्राणुदोष व होमिओपॅथी



प्रयत्न करुनही मूल होत नसले की अापल्याकडे अाधी तपासणी अाणि उपचार होतात ते स्त्रीवर. तिच्या बाबतीत सर्व गोष्टी (गर्भाशयापासून ते हॉर्मोन्सचे प्रमाणापर्यंत) यथायोग्य असल्या की वीर्यतपासणी साठी नवरा तयार होतो, अाणि बरेचदा त्या तपासणी मधे वीर्यामधे शुक्राणुंची संख्या कमी असणे किंवा निरोगी शुक्राणुंचे प्रमाण कमी असणे याप्रकारचे दोष अाढळतात. अर्थातच, नाइलाजाने ‘ह्यां’च्यावर उपचार घेण्याची वेळ येते. या अाजाराची कारणे व त्यावरील होमिअोपॅथीक उपचार यांबाबत अाज अापण माहीती घेऊ.

पण मूळ विषयाची चर्चा करण्याअाधी वीर्य व शुक्राणू यांच्यातील फरकही समजून घ्यायला हवा; कारण अनेकदा या दोन्ही संज्ञा रुग्णांकडून एकमेकांना पूरक म्हणूनच वापरल्या जात असतात. वीर्य हा एक पांढर्या रंगाचा द्रवपदार्थ असतो, जो अापल्या डोळ्यांना दिसू शकतो. वीर्य हा शुक्राणू वाहून नेणारा, शुक्राणूंना शरीराबाहेर सक्रिय ठेवणारा, त्यांची निगा राखणारा स्त्राव अाहे. शुक्राणू म्हणजे फक्त मायक्रोस्कोपखाली दिसू शकणार्या अतीसूक्श्म प्रजोत्पादक पेशी अाहेत. वीर्याचा रंग, घट्टपणा किंवा प्रमाण यांवरुन शुक्राणूंच्या अारोग्याबाबत अाडाखे बांधता येत नाहीत. वीर्याचे प्रमाण जरी पुरेसे असले तरी त्यात शुक्राणू असतीलच असे नाही.

निरोगी व्यक्तीच्या एक मिली वीर्यामधे साधारण दिड ते वीस कोटी शुक्राणू असतात. यातील सर्वच पूर्ण वाढ झालेले असतीलच असे नाही. त्याहून कमी शुक्राणू असतील तर तो दोष मानला जातो. अर्थात, प्रजननासाठी केवळ एक निरोगी शुक्राणू ही पुरेसा असतो, त्यामुळे शुक्राणूंच्या संख्येपेक्षा त्यांची पुरेशी झालेली वाढ अाणि गर्भाशयाच्या अातवर पोहोचण्याची शक्ती यांवर गर्भधारणा अवलंबून असते.

लक्षणे :

शुक्राणू कमी अथवा पुरेसे निरोगी नसतील तरी त्याची शारिरीक लक्षणे काहीच दिसत नाहीत. योग्य प्रयत्न करुनही मूल न होऊ शकणे हेच एकमेव लक्षण दिसते.

शुक्राणूंची संख्या अाणि अारोग्य अनेक कारणांमुळे बिघडू शकते.

वैद्यकीय कारणे:

  • व्हेरिकोसील : अंडाशयाभोवतालच्या नीलांमधील दोष
  • जंतूसंसर्ग : गालगुंड, एडस्, गुप्तरोग
  • संप्रेरकांतील असमतोल
  • शुक्राणू-मार्गातील दोष
  • सीलीएॅक डीसीज
  • मधुमेह
  • जनुकीय अाजार
  • काही अौषधांचा दुष्परीणाम

वातावरण व जीवनशैली:

  • दारू व तंबाखू / सिगरेटचे व्यसन
  • इतर नशा
  • स्थूलता
  • रासायनीक खते किंवा रंगांचे साहित्य, शिसे, बेन्झीन अशा रसायनांशी सततचा संपर्क
  • एक्स-रे अथवा रेडीएशन
  • सतत गर्मी असलेल्या जागी काम करणे (भट्टी) किंवा घट्ट अंतर्वस्त्र घालणे, सतत मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने त्याच्या उष्णतेमुळे सुद्धा शुक्राणूंत दोष दिसून अाले अाहेत.

याशिवायही अनेक केसेस अशाही अाढळतात जेथे वरवर पाहता कोणतेच कारण सापडत नाही, पण तरीही प्रकृतीदोषामुळे शुक्राणूंची संख्या अथवा अारोग्य कमी असते. होमिअोपॅथीचा उपयोग अशा रुग्णांत सर्वात जास्त होऊ शकतो. शुक्राणूदोषावर उपयोगी ठरू शकतील अशी होमिअोपॅथी मधे साधारण ३५ हून अधीक अौषधे अाहेत. कॅलेडीयम, कॅन्थॅरीस, कोनायम, डामिअाना, फेरमब्रोम, न्यूफर, फॉस्फरिक अॅसीड, सेलेनीयम व झींकम ही त्यातीलच काही. बाराक्षारांपैकी कल्केरिया फॉस, सिलीका व नॅट्रमफॉस यांचा वापर प्रामुख्याने होतो.

प्रत्येक रुग्णाच्या लक्षणांप्रमाणे व प्रकृतीनिदानानुसार योग्य ते अौषध व त्याची मात्रा निवडली तरच गुण येऊ शकतो. होमिअोपॅथीक तज्ञाला याचे ज्ञान असते व त्यामुळे अापले अापण एेकीवात माहीतीवरुन अौषधोपचार करणे टाळावे. 

पण त्याअाधी हा दोष निर्माण होण्यामागील कारणांचा तपास करावा लागतो. यातील जनुकीय अाजार किंवा शुक्राणू मार्गातील दोष यांसारख्या कारणांवर अौषधाचा फारसा उपयोग होत नाही. व्यसनाधीनता, उष्णता, रासायनीक संपर्क किंवा रेडीएशन या कारणांना दूर केल्याशिवाय दोष बरा होत नाही.

अनेकदा यामुळे येणारे वंध्यत्व नैराश्याला कारणीभूत ठरते, अशावेळी योग्य पुष्पौषधी वापरुन त्यावर मात करता येते.

तात्पर्य:

बदलती जीवनशैली, व्यसनाधीनता व इतर काही दोषांमुळे शुक्राणूंची संख्या व अारोग्यावर घातक परीणाम होत असतो. त्यामुळे निर्माण होणारे वंध्यत्व दूर करण्यासाठी होमिअोपॅथी हा एक परीणामकारक पर्याय ठरु शकतो.